Sunday 21 June 2020

रायगड


रायगड



















































आडवाटंला म्हणावं त हमरस्ता पडतोया आन हमरस्ता म्हणावं त आडवाटंला हाय, घाटाच्या खाली म्हणावं त घाटवाटा आडवल्यात आन घाटाव म्हणाव त कोकनाव नजर हाय, सह्याद्रीचा डोंगुर म्हणावं त येगळा झालाय. आन येगळा म्हणावं त सह्याद्रीला तसूभर बी कमी नाय. सह्याद्रीनं असं इटुळ घातलंय की घेऱ्यात उभं राहिल्याशिवाय गड वळीखता येत न्हाय. हे सह्याद्रीचं लेकरू, ह्याचा जलमच शिवबासाठी. घडीव अशी की ज्वालामुखी वडवानलानी पिळून काळ्या पाषाणाचा सिंव्ह आभाळाकडं गरजत उभा केलाय. चहूबाजूनी कडं आसं ताशीव की वाऱ्याशिवाय वर आन पाण्याशिवाय खाली उतरायची- यंघायची छाती नाय कुन्हाची. काळ आन गांधारी ह्या दोन नद्या चार महिने पावसाळ्याच्या दुथडी पहारा देत्यात. ह्याच्या मस्तकावरला पाऊस म्हंजी तांडव. सहाशे वर्सापूर्वी पाळेगार नांदत व्हता त्यानी विजयनगरला मुजरा हान्ल्याव तेंच्या ताब्यात गेला. नंतर निजामशाही, इदलशाही. पूर्वी 'तणस' आन 'रासिवटा' ह्या दोन नावांनी वळखित; नंतर रायरीचा डोंगुर. माझ्या राजाचा पाहिलं पाऊल लागलं आणि त्यांनी पहिली डरकाळी फोडली. त्याचं झालं असं.... जावळीवच्या वतनाव राजांनीच बसवलेला यसवंतराव मोरे सापासारखाच सवराज्याव उलाटला. त्याच डोचकं ठेचायचं व्हतं म्हून जावळी रातोरात मारून काहाडली. अल्याड जोरला हनुमंतराव मोरे ठेचला. जावळीतला मोरे रायरीव पळाला. तेच्या मागोमाग राजं. रायरीव घेरा पल्डां. शिळीमकर आन जेध्यांनी रायरी घेरली. हात हात झाडं कापून राजांनी घेरा नजरबंद केला. टकमकीपाशी आल्याव सुं सुं करीत तीर आल्यालं. मोऱ्या वरून जाच करीत व्हता. शेवटाला वाट गवसलीच आत्ताचा ज्यो वाघ दरवाजा हाय ना तीच निस्नीची वाट. वाट कसली मरणवाटच की. पाय निसाटला की हाडाचा भुगा आन मासाचा लगदाच. हिथं यंघाया वान्याराचं पिन काम न्हाय. हिथं घोरपडच. महाराजांकडं दोन पायाच्या अश्या लई घोरपडी व्हत्या. सह्याद्रीच्या अंगाखान्द्याव हिंडताना हेरल्याल्या. वैशाखातल्या वनव्यानी वाळल्यालं गवात धरीत दोन पायाची घोरपड वर यंघली आन दोराच्या माळा लावून हैबतराव शिळीमकरांनी मोऱ्याला जेरबंद केला. महाराज रायरीव यंघले आन गुंगाटल्याला सिंव्ह गरजाया लागला. डोंगराचा गड आन रायरीचा राया झाला. रायगड.  म्होरं पन्हाळ्याच्या यढ्यात राजं अडकल्याव राजापूर वखारीच्या लाल माकडांनी पन्हाळ्याव कंपनीचा बावटा लाऊन तोफा डागल्या. त्याची चुकती म्हून पन्हाळ्याहून निसटल्याव राजापूरची वखार लुटून लाल माकडांचा सुपडा साफ केला ; आन चोवीस हजार होनांची लूट रायगडाच्या डागडुजीसाठी वापारली. ही रायगडावून पहिली डंक्याची तोफ महाराजांनी डागली. ह्या भरपाईचं टुमनं लाल माकडांनी राज्याभिषेकापर्यंत लावलं. तेरा वर्षे रायगडाच्या चकरा माराय लावल्या माकडांना आन पदरात धोंडा बांधला. उस्टीक आला, निकल्स आला, नारायण शेणवी आला, आन सरते शेवटी राज्याभिषेकाच्या येळस हेन्री ऑक्जीन्डन आला.  १६५६ पासून चालू झाल्याल गडाचं काम राज्याभिषेकानंतर पिन चालूच व्हतं. याच समयाला कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद इजापूरला खजिना घिऊन चालल्याला त्याला पिन लुटला. सुरतेची लूट आन रायगडाचा तोरा एकाच नाण्याच्या दोन बाजू. रयतेला लुटून मोगलाई माजाटली व्हती. सुरत लुटून जरा तिची चरबी कमी केली. रायगडला हिरुजीनी असा सजावला की गडाच्या आभाळमाथ्याव त्याचं वैभाव बघाया देव जमा झालं. उत्तरेतून त्रिविक्रमपूर म्हंजी आत्ताचं टिकमपूर हिथून एक कवी घर सोडून राजांची कीर्त ऐकून लमाणतांड्याबरुबर चालत चालत रायगडाव आला. आडनाव त्रिपाठी आन नाव भूषण. ह्यो गड बघावा- ऐकावा त फकस्त तेच्या नजरंतून तेच्या सब्दातून. तेचा सबुद म्हंजी वनव्यातल्या आगीचा नुस्ता लोळ. ढनाना पेट घेणार. किसन देवाच्या भाषेत राजाची कीर्त आख्या हिंदुस्थानात गायली.

पंपा मानसर आदी तलाब लागे

जेहीके परन में अकथ युग गथ के

भूषण यो साज्यो रायगढ सिवराज रहे

देव चक चाही कै बनाए राजपथ के

बिन अवलंब कलीकानि आसमान मै है

होत बिसराम जहा इंदू औ उद्य के

महत उतंग मनि जोतिन के संग आनि

कै रंगचक हा गहत रविस्थ के

 मनिमय महल सिवराजके इमी रायगढ मै राजही

लारणे जच्छ किन्नर असुर सूर गंधर्व हौसेनी साजही

उत्तंग मरकत मंदिरन मधी बहु मृदंग जू वाजही

घन समै मानहू घुमरी कारीघन घनपटल गलगाजही

मुकतान की झालरीन मिली मनी माल छज्जा छाजही

संध्या समै मानहु नरवत गन लाल अंबर राजही   

असा कवी लाख वरसातून एकदा जल्माला येतुया. राज्याभिषेकाला रायगड असा सजवला इंद्रपुरी पुचाट. तुळणा झालीच त पांडवांच्या इंद्रप्रस्थाची. मयसभा न्हाय  पिन बघणारंचं भान हरिखंलं. भीमानी जरासंधाला तोडला आन पांडवांनी इंद्रप्रस्थाचं नगरपूजन करून अश्वमेध यज्ञ केला आन धरम राजा चक्रवर्ती सम्राट झाला. तसंच राजांनी आफ्जुल्य्या फाडला, शाहीस्त्या तुंडा केला. इनायतखानाला भुंडा केला. सिद्धी जौहारला वाकवला. उदेभानला चिरला. कारतालब खानाला खिंडीत गाठून पाय धराया लावलं. मोगलाई फाकावली आन ईदलशाही वाकावली, जंजीऱ्याच्या उंदराचा बंदोबस्त केला. लाल माकडांना तडाखे दिले. घरभेद्यांना शास्त केली. समिंदराव  कब्जा केला. गडामागून गड घेतलं आन राज्याभिषेक करवून हिन्दुस्थानचं राजं झालं. मोहीम मांडून मोठी दख्खन विजय केला. नंतर म्होर रायगडाला हादरा बसला हनुमानजल्माला गडाव धरणीकंप झाला आन राजं परबरम्हात इलिन झालं. रायगड पोरका झाला. गडाव बंडाळी माजली. गडाला स्वामी उरला न्हाई. त्यायेळी रायगड आतून धुमसत व्हता. पर शेवटी छावा उसाळला. आगीचा लोळ वाळल्याल्या चिपाडात शिरावा तसा माझा शंभू राजा. ज्वलनज्वलतेजस संभाजी राजा. बंडाळी मोडून काढली. अनाजीपंताला हत्तीचा पाय दाखवला. मालसावंताला टकमक दाखावली. फितुरांना शास्त केली. राज्यभिषेक करवून घेतला. धाकंलं धनी राजं झालं. चौ बाजूनी वावटळ आली नऊ वरसं एकट्यानी जुझ दिल्ही. शेवटाला मरान लाजलं. ब्रम्हांडाला धरमवाट दाऊन राजं मोकळं झालं, आन रायगडानी धाय मोकलून हंबरडा फोडला. त्याच वरसाला सरवनात इतिकातखान आन याकुदखानानी गडाला यढा दिल्हा. महाराणी येसूबाई गडउतार झाल्या आन पहिला घन बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर बसला. इतिकातखानानी तुकडं तुकडं करून सिंहासन पोत्यात भरलं. द्वारिका समुद्रात लोटून किसन देव निघून गेला. तसंच काळानी ह्या हैवानांच्या हातात रायगडाला लोटलं. रायगडाच्या दुर्दशेला सुरवात झाली. याकुदखानानी आणि इतिकादखानानी गडाव इध्वंस मांडला. यासाठी म्हून औरंग्यानी इतिकादखानाला झुल्फिकारखान ही पदवी दिल्ही. म्होरं पेशवाईत समाधीची दिवाबत्ती रोज केली जात. स्वामींच्या तख्ताची पूजा केली जात. म्होरं पेशवाईच्या उतरत्या काळात रायगडचा कैदखाना झाला. म्होरं रायगडाच्या लई मोठ्या इध्वंसाचा दिस उजाडला. १ मे १८१८. प्राथर ह्या लाल माकडानी पोटल्याच्या डोंगराव लांब पल्याच्या तोफा चढवल्या आन आठ दिस तोफांचा मारा केला. राजांनी रक्ताचं पाणी करून उभा केल्याला रायगड कोसळला. म्होर सला झाला. मराठे गड उतार झाले. लाल माकड गडाव गेली त्यायेळी वाराणशीनबाई वाड्याच्या धुमसत्या राखंसमुर बसून अश्रू ढाळत व्हत्या. लाल माकडांच्या कुल्फीगोळ्यांनी फुटून रायगड अकरा दिस जळत व्हता. नंतर शंभर वरीस रायगडाक कुन्ही फिराकलं नाय. गडावरले धनगर पायथ्याला जाऊन पोटासाठी रानोमाळ पांगले. नंतर १८९५ ला आन्ग्रेजांचा फारीस्ट खात्यातला एक अधिकारी सिंक्लेअर त्याचं नाव त्यो गडाव एक दिस आला आन राजांच्या समाधीची अवस्था त्याला बघावली नाय. त्यानं पदरचं पैसं टाकून समाधी नीट केली. आन सरकारकडून समाधीच्या देखभालीसाठी दरवरसी पाच रुपयाची येवस्था लाऊन दिल्ही. मंग आपल्यांना जाग आली आन तिथून म्होर समाधीच्या जीर्णोधाराचं काम चालू झाल. गड हळूहळू पुन्यांदा जागता होऊ लागला, नांदता होऊ लागला. पायथ्याच्या धनगरांनी वर वळचणीला येऊन पुन्यांदा थारा घेतला. दुर्गपंढरीचे धारकरी गडाव येऊन राहू लागले.

म्या त्यातलाच एक फिरस्ता, वाटाड्या धारकरी. म्या तिन्ही त्रिकाळ गडाव येतो आन चांगल चार –पाच दिस तिथं राहतो. गडावून पाय एका दिसात माघारा फिरल्यात असं कंधीच झालं न्हाय. परतेक ऋतूत रायगडाचं येगळ रूप बघाया मिळतं. उन्हाळ्यातला रायगड दुपारी रखरखीत आन सकाळ – संध्याकाळ शीतळ रातच्याला आभाळ नितळ. सदरंव पडायचं आन आकाशगंगा न्याहाळाची.  कवी भूषण बिन अवलंब कलीकानि आसमान मै है l होत बिसराम जहा इंदू और उद्य के महत उतंग मनि जोतिन के संग l आसं का म्हणतो ते समाजतं. चांदण्या दाटीवाटीनं लुकलुक करीत राजसदरंकडं तांबडं फुटंपर्यंत पघत असत्यात. पूर्णिमा असंल त भाग्यच उजाळतंय. चांदोबा डोळ्यादेखत हाताला यील का काय अस वाटत रहातं. ग्वाड गार वाऱ्याबरुबर झोंबाझोंबी कराची. आन धनगर आवश्यात अन्नपूर्णामायकडं केंबळीव झोपाया जाचं. अन्नपूर्णामायइषयी म्होरं माहिती यीलच. उन्हाळ्याच्या दिसात तांबडफुटी चुकवायची न्हाई. आवश्यातलं कोंबडं आळीपाळीनं आरावत्यात. साद घेऊन येरवाळीच उठायचं. गडाचा सुर्व्या भवानी कड्याव उगावतोय. त्या आंगुदर  तांबडफुटीची लढत बारकाईनी बघायची, नुसत्या भगव्या रंगाच्या दहा –पंधरा कडा पाझरत राहत्यात. तांबड्या आन भगव्या रंगाचं जुझ होऊन गेरूचा रंग तयार होतोया आन त्यामधून सुर्व्या नारायण परकटतोय. सुर्व्या उलीउली वरलाकडंला सरकल्याव लिंगाणा झळाकतोय. आन मंग भवानी कड्याच्या आन लिंगाण्याच्या गप्पा सुरु व्हत्यात. गडावरचा सुर्व्या मावळतोय हिरकणी बुरुजाव. तांबडफुटीची जी गत तीच थोड्या फरकानं मावळतीची. दोन्ही वक्ताला भगवा गडाला सलामी देऊन काळाची रहाटी हाकतोय.

पाउसकाळातला रायगड डोळ्यांनी टिपावा आन काळजात साठवावा. उलीउली करून रोज रातच्याला स्मरावा. भूक भागत नाय आन धुंद उतरत नाय. पाचाडहून पघितल की गड धुकटानी भूलल्याला असतोया. धुकाट टकमकीला घेऊन आभाळात शिरतंय. जसं जसं वरती जावं तसतशी भूल चढत जाती. परतेक टप्प्यावून सभोवार पघावा. हिरवाईची झुंबड उडाल्याली असती. वरून खळाळ झुळूझुळू नाचत येतोया, त्यात ओंजळ घालावी ढेकर द्यावा म्होर निघावं. ढग इरून मंधी सुर्व्या दिसला त अपूर्वच चितारतंय. ढगुळ भरून आला की सांदी– कपारीत लपावं. कुडकुडत्या अंगानी समुर निखाऱ्याव कणीस भाजून घ्यावं, करंडत करंडत दुसऱ्या टेपाव चहासाठी थांबावं. चहा अगुदर कांदाभजी आपसुखच येत्यात. बरुबर आमच्या धायरीचा पैलवान सागर पोकळे आणि बाप्पू पोकळे असल्याव त आठ- धा प्लेटी पोटात कधी गडप व्हत्यात ते कळत न्हाय. राज्याभिषेकदिनाला असाच एकदा गड चढून गेलो. रात्री बाराला गड चढाया सुरवात केली, जगदीश्वरापाशी गेलो दर्शान घ्यातलं आन बाहेर प्राकारातच पहाटपर्यंत ताणून दिली झोप कसली येतीया. एकमेकांच्या कानात इकडच्या तिकाडच्या गप्पा कुजबुजत राहिलो. भूक काय झोपून द्यायना तव्हा पहाटं चार वाजता जवळच्या खोपटात झोपल्याला मावशीला उठावलं आन पोहे कराया लावलं. भुक्याजल्यालो व्हतो मावशीची धांदल उडाली. सात मोठ्या थाळ्या पोह्याच्या तिघात उडावल्या. आन त्यानंतर दोन दोन कप चहा. रायगडाव भूक बळावती आयुष्य वाढतं.

हिवाळ्यातला रायगड आल्हाद असतोया. सोनकीच्या पिवळ्या फुलांनी जर्द झाल्याला गड भंडारा उधाळल्याल्या जेजुरीसारखा दिसू लागतो. हिवाळ्यात रातच्याला गडाव उब शोधावी आन नीज ल्यावी. सकाळच्याला उशिरा उठावं आन आवरून गड चाळावा. दुपारी केंबळीव आलं की अंगात बकासुर शिरल्याला असतोया.  हिवाळ्यातली गडावरची भूक म्हंजी पोटात आनंदानी खवाळल्यालं ब्रम्ह. त्याला तृप्त करण्याच काम अन्नपूर्णामाय करती. ती म्होर हायेच....हिवाळ्यातलं धुकाट अंगाला बोचतं. हिवाळ्यात टकमक टोकाव अर्धा दिस बसाव. फकस्त वाऱ्याचं ऐकावं मधी ब्र पण काढावां नाय.

रायगड म्हणलं की आमचा पैलवान सागर पोकळे आणि मी हे ठरल्यालं. सागर शिवाय मी क्वचितच गडावर जाऊन राहिलोय. रायगडावरच्या माझ्या हिंडफिरीची सावली म्हंजी सागर. रायगड आणि माझ्या नात्यातला साक्षीदार म्हंजी सागर. ओसाडल्याल्या, भग्न अवशेषातून शिवकाळ ज्याच्या बरोबर राहून मला अनुभवता येतो त्यो हा माझा जिवाचा जीवलग. शिवभारतानंतर महाभारतावर आमचे इशेष प्रेम. किस्नाचं दोघांनाही याड. वारं, उन, पाउस, थंडी, धुकाट ह्यांचा आनंद लुटीत  आम्ही दोघांनाबी रायगड जमल तसा हुडाकला. तरी पाच टक्केबी रायगड कळाला न्हाय. किल्ला बघावा कसा हे आप्पांची पुस्तकं वाचून मी शिकलो. रानभुली'तील आप्पांची लाडकी मानसलेक मनी आत्ताची मनी आज्जी तिला भेटायची आम्हाला लई इच्छा व्हती. इचारपूस करीत आम्ही पुनावड्यात पहुचलो त घराचं दार बंद व्हतं. शेजारी इचारपूस केली त कळालं की म्हातारी मागच्या गावात रेशन आनाया गेली हाय. मंग मागच्या गावात गाडी वळवली त म्होर गेल्याव एक म्हातारी डोक्याव पाच किलो धान्याचं बाचकं टाकून येत व्हती, "मनी आज्जी का, इचारल्याव....हा म्या मनी आज्जी....आन मला कसा काय हुडकलं लेकरांनो म्हनाली. मंग आज्जीला तशीच गाडीव टाकली आन तिच्या घरी गेलो. आज्जीनं घराच्या देशी गाईच चांगलं तांब्याभर दही दिल्ह. चांगल्या तासभर गप्पा हाणल्या. मनी आज्जीन काकुळतीनं आप्पांची आठवण काल्ढी. आपण पुस्तकातून ज्या पोरसवदा मनिला भेटलो, तिच्या सुखात हसलो आन दुखात रडलो ती ही मनी. आत्ता चेहऱ्याव सुरकुत्या पडल्यात आन पाय थकल्यात. डोळ्यांव इस्वास बसत नव्हता. सिद्धहस्त लेखक आपली पात्रं अशी चिरतरुण ठेवतो. वरून आकाशीच वझं घेऊन आल्याला लेखक खाली रितं करतो. आप्पा हा देवकुळीचा माणूस. तेंच्या पाउलखुणा आजबी भाळी लाऊन आमच्यासारखी फिरस्ती मानसं सह्याद्रीत बिनघोर फिरत्याती.

यस्वन्ता भेटला नसता त गडाच्या पायथ्याला उपऱ्यावाणीच राहिलो असतो. हेची माया काय सांगावी. जन्मापासून एका पायानी अधू असल्याला यस्वन्ता गडाव वाचमन हाय. पायथ्याला पोहचाया रात झाली तरी तेच्या घरात निवारा मिळतोय. लई माणसं असली त दूसरीकडं सोय करून देतो. निघतासमयी सागर आणि मी असंल त राहण्याचं- जेवणा – खावनांचं पैसं किती झालं असं इचारल्याव म्होर निघून जातो. "पैस नाय घेतलं त परत येणार नाय, असं म्हणल्याव म्हणतो, परत नाय येणार त पुण्याला किती दिस रहाणार....कधी न कधी तुम्ही येणार की." लई रेट्यानी पैसं खिशात ठेवाया लागत्यात. " जगरहाटी कुन्हाला चुकली " म्हून. हेच्या मुळच अन्नपूर्णामाय आम्हाला भेटली. गडाव पहिलीछुट आठवडाभर राहायचं व्हत एमटीडीसीच्या खोल्यांचं पुनर्निर्माण चालू व्हतं, आन त्या चालू असत्या तरी परवाडनारं नव्हतं....म्हून मंग यास्वन्तानी जगदीश्वराच्या माघच्या धनगर आवश्यात सुरवातीची केंबळी सुचावली. आम्ही कुठही राहयला तयार व्हतो फक्त निवारा पाहिजे व्हता. ही केंबळी सुमन मावशीची म्हणजी आमची अन्नपूर्णामाय. जे रांधील त्याला चव. नुस्ता खरपूस दरवळ. तिच्या पदार्थांची यादीच देतो १) वाटाण्याची आमटी- भात, चटणी- दही २) मुग-बटाटा, खाली लुसलुशीत वरती कडक पापुद्र्याच्या तांदळाच्या भाकऱ्या, खिचडी- भात, ताक. ३) पिठंलं –भाकर –भात –मसालाकांदा- दही ४) कांदा- भजी, बटाटा-भजी, कढी-भात ४) ताकभात-चटणी, ५) दहीभात-चटणी ६) मुगाची आमटी – भात, लसणाचा ठेचा ७) जगातील सर्वश्रेष्ठ अंडाकरी आणि कोंबडी रस्सा. मी मायकडं जेवढा जेवलो तेवढा कधीच आणि कुठंच जेवलो नाय. गावरान गाईचं तूप शहरात दोन हजार रुपये किलो चाललंय ते पिन भेसळीवालं. घरच्या गावरान गाईचं तूप आणि भात प्रेमानं वाढणारी आन तुपाची आख्खी बरणी समुर ठेऊन किती पण खा म्हनणाऱ्या माझ्या अन्नपूर्णामायचं जेवण जो जेवला त्यो जोगावला, धन्य झाला. तृप्तीचा ढेकर म्हंजी काय तिच्या हातचं खाल्ल्याशिवाय सर्गातल्या देवाला पिन कळणार नाय. सागरला आणि मला आम्हाला दोघांनाच वाटलं आम्हीच लई जेवतो....आठ- दहा भाकरी एकएकट्यानी खाऊन इरशीर दाखवायचो पिन ज्यायेळी 'पुरंदर केसरी' बाप्पू पोकळे- मी आन पैलवान सागर आमच्या तिघात भाकरीची लढत झाली त्यायेळी सागरनी आन मी नांग्या टाकल्या आमचा गर्व बाप्पुनी उतरावला चौदा भाकऱ्या खाऊन. सुमन मावशी अन्गुदार काल्वान– भात उरकून घेती मंग चुलीपुढं आम्ही भाकऱ्या चालू असताना बसणार मंदी एक टोपलं आसतंय त्यात दोन फुठाहून भाकरीची भिंगरी पडणार आम्ही ती उन उन उचलायची आन मंग लढत चालू ठेवायची. आम्ही खायला दमू पिन मावशी दमणार न्हाय. असाच एका पावसाळ्यात आम्ही दुपारचं सुमन मावशीकडं पोहोचलो, "जेवायला काय हे इचारल्याव, गडावची रानभाजी चालताव का, चालताव नाय माय पळताव. अन्नपूर्णा मायनं भाजी बनावली, काय सांगू ...मटान नांगी टाकतंय रायगडावच्या रानभाजी म्होर. आत्तापर्यंत मी मावळात कुळई, बेन्द्रा, चीचार्डी, करटूली ह्या भाज्या खाल्य्यात पिन ह्या भाजीची तऱ्हांच न्यारी. म्या त्या भाजीचं नाव इचारलं पिन कुन्हाला त्याचं नाव माहिती नव्हत. तिच्या नावाचा पत्त्या काढण म्होरच्या वरसाला बाकी ठिवलया.

आता आपण गडाव परत सुरवातीपासून यंघाया सुरवात करू. सगळ्यात पहिल्यांदा पाचाडला याचं औसाहेबांच दर्शान घ्याचं, तेंची कीरत आन मुरत डोळ्यासमुर आणायची आख्खा महाराष्ट्र वसाड पडल्याला असताना मातेने त्यो पुन्हा वसवला. खवासखानानी रायारावाकडून पुण्याची होळी करून तिथं गाढवाचा नांगुर फिरावला, तिथं शिवबाकडून सोन्याचा नांगुर फिरावला. व्ह्साडल्याली घरं नांदती केली. देवळातून निघून गेल्याला देव तेच्या हाताला धरून परत तेला देवळात बिनघोर बसवला. देवळं धुपती केली. मानसं जागती केली. बारा मावळातली मानसं निवाऱ्याला पुनवडीत आणली. पेठा वसवल्या. कस्ब्यातल्या गणपतीचा जिर्णोधार केला. तांबड्या जोगेश्वरीव छत्र धरिलं. मुर्दाडल्याल्या माणसांवरून संजीविनी फिरावली. पुंडांचा आन गुंडांचा बंदोबस्त केला. तेनांच नोकरीव ठिवलं. आया-बहिणी दिवसाढवळ्या पानवठ्यापासून चव्हाट्यापर्यंत उचलून नेल्या जायच्या त्यांचा चौरंग्या केला. तेंच्या म्होरं शिवबा नावाचं कवचकुंडल ठेवलं. समाधीम्होर नतमस्तक व्हयाचं म्होरं पाचाडलाच तेंच्या वाड्याकडं निघायचं....वाड्यात याचं वाडा फिरायचा तिथं जुन्या विहिरीच्या वरती एक दगडी आसन हाय तिथं महाराज बसत, तेंचं मुद्राआसन स्मरायचं. तिथून रायगड श्वास रोखून बघायचा. म्होरं निघायचं. पायथ्याला याचं पहिला टप्पा नाणे दरवाजा. काही नाना दरवाजा म्हणत्यात. तेला हे नाव का ह्या इषयी लई मतं हायती. कोण अभ्यासक म्हणत्याती नाना फडनिसानी तेची डागडुजी केली म्हून तेला नाना दरवाजा म्हणत्यात. काही अभ्यासक म्हणत्याती की कोकणात लहना म्हनजी नान्हा. महादरवाजाच्या तोडीला नान्हा. पर गोपाळ चांदोरकर सांगत्यात ते पटतंय प्राचीन काळी तिथ जकात चलनी नाण्याच्या रूपानी गोळा केली जायची तिथ नाणी गोळा कराया एक दगडी भांड पिन अंजून तुटल्याला अवस्थेत हाय. नाणी गोळा करायचा दरवाजा म्हंजी नाणे दरवाजा. दरवाजातल्या मारुतीला नमस्कार करून म्होर निघायचं खूबलढया बुरुजापाशी थोडी इश्रांती घ्याची म्होरं सरकायचं महादरवाजाला यायचं तासभर तिथं घालवायचा. महादरवाजावरून पाहिलं की उजवीडकडं तटबंदी सुरु व्हती ती टकमकीच्या मध्यान्ही जाती आणि डावीकाढली हिरकणी बुरुजाच्या दिशेनी जाती. डावीकडं दोन तोफा हाये. आन उजवीकड दोन – चार हायेती. राजं येतानी सलामीची तोफ देऊन्श्यान कशी हाळी गरजत आसल ते आठवायचं....हाळी कानात गुंजत गुंजत रहाती. वरच्या टेपाडाव जाऊन थांबायचं तिथं एक लोखंडी खांब रवल्याला हाय त्याला माथ्याव एक कडी गुंफलेली हाय तिथलं गाईड सांगत्यात संभाजी राजांचा मलखांब हाय म्हून....काही सांगत्यात हत्तीला बांधायचा खांब हाय म्हून.....तर ते काय खरं नाय. त्या खांबाच्या सम्बुर जर पाहिलं त एक किलोमीटर च्या अन्तराव दुसरा तसलाच खांब मुसलमानी थडग्यापाशी हाय. ते सूर्यघटिका यंत्र हाय. गोपाळ चांदोरकरांच्या मते अडीच हजार वरसापूर्वी रायगडाव हवामान खातं व्हत. असलाच एक खांब राजमाचीव पिन पडलाय. आता हे थडगं मदारी मेहतरचं पिन म्हणत्यात तेला मदनशहाचा दर्गा पिन म्हणत्यात. पर अजून ठोस असा पुरावा नाय. तिथून म्होरं गेल्याव वाटंत गंगासागर तलाव लागतोय. रायगडाच्या बांधकामाला जो पाषाण लागलाय तो हिथून खोदलाय. असाच एक भवानी टोकाच्या डावीकडं खोदलाय तेला काळा हौद म्हणत्यात. महाराजांच्या अभिषेकाला गंगेचं पाणी आणलं व्हतं अभिषेकानंतर उरल्यालं पाण्याच्या घागरी ह्यात टाकल्या म्हून ह्यो गंगासागर. गंगासागराच्या डावीकडून गेल्यावर हनुमान टाकं लागतंय. त्या टाक्याव हनुमान  कोरलाय म्हून ते हनुमान टाकं. तिथून म्होर छुप्या वाटंन यंघ्ल्याव आपुन बाजारपेठेकडं पहुचतो....पर आपण आत्ता चाललोय पालखी दरवाज्याकडं. पालखी दरवाजातून ज्यांना पालखीचा मान हाय त्यांनाच आत प्रवेश व्हता. पालखी दरवाजासमोर एक भल्या मोठ्या ओसरीचे अवशेष हायेत ती त्या काळची 'वेटिंग रूम' आत्ताच्या हाफिसात जे 'रीसेपश्न' असतंय तसला परकार. पालखी दरवाजातून आत गेल्याव उजव्या बाजूला भल्या थोरल्या खोल्या लागत्यात, खोल्या कसलं आत्ताचं मोठमोठं बंगलंच म्हणायचं. त्याला राणीवसा म्हणत्यात पर गोपाळ चांदोरकरांच्या मते ती राज्यकारभाराची कार्यालये व्हती. डाव्या बाजूला राजवाडा चालू व्हतो. पुढं सरळ मेना दरवाजा हाय. तेच्या खाली रोपवे. राजवाड्याच्या पश्चिम बाजूला तीन विजयस्तंभ दात पडल्याल्या सिंव्हावानी अजून तग धरून हायेती. तेला आतमधी कारंजं हायेती आन परतेक खाम्भाला दिवडी हाये. दिवं लावल्याव कारंजं काय दिसत असत्याल ते फकस्त आठवायचं. तेच्या बाजूला टांकसाळ, किती खंडीनी होन आन शिवराई पडली आसल. म्होरं गेलं की तळखाण्यात रत्नशाळा, म्होरं राजसदरेचा भाग चालू व्हतो. आत्ताचं सिंव्हासन तीच पूर्वीची बत्तीस मन सोन्याच्या सिंव्हासानाची जागा. समुर नगारखाना. लाल माकडांच्या तोफेम्होरं हा एकटा बहाद्दर झुकला नाय. वरचा कौलाचा भाग सोडला त आंग्रेज त्याच्या एका चिरेची ठिकरी उडूवू शकले न्हाई. सिंव्हासानापासून नगारखान्याचं अंतर अडीचशे फुट हाये, तिथून हळू बोललं तरी नगारखाण्यापतुर सपस्ट आवाज जातुया. हिथं हिरुजी इंदलकरांनी ध्वनीविज्ञानशास्त्राचा उपयोग केला हाये. सिंव्हासानापासनं राजांचं आवडतं गड तोरण्या आणि राजगड सपस्ट दिसत्यात. पंधराव्या वरसी तोरण्यापासून कारकिर्दीला सुरवात झाली ती रायगडावर येऊन दिगंतात पहुचली. अंजून डफ गरम होतुया दिमडी ताल धरतिया कवनं आन पवाडं अस्मानाला ललकारी देत्यात. नगारखाण्यापासून उजवीकडं गेल्याव कुशावर्त तलाव तेच्या माथ्याव व्याडेश्वर मंदिर. शिवकाळात काय नजारा आसल एवढ आठवून   डोळ्याची पारनं फिटत्यात. तिथून म्होर खाली गेल्याव गायमुख हाय तेच्या शेजारी कारंज्यांचा जस्ताचा पाईप अजून तसाच हाये, कुशावर्त तलावातून खाली कारंज्या आन गोमुखातून पाणी पडत आसल आणि म्होर राजबाग आसल. तेच्या शेजारी मंत्रीमहाल हायेती, तिथून सपस्ट पोटल्याचा डोंगुर दिसतुया. तिथून म्होर खाली गेल्याव वाघ दरवाजा. त्यो पघून परत होळीच्या माळाव यायचं तिथून थोडं खाली गेलं की शिरकाई देवीचं दर्शन घ्यायाचं त्यासमूर पूर्वीची नाट्यशाळा. तेला काहीजन गजशाळा म्हणत्याती पर ते खरं न्हाय. तेला चिकटून बाजारपेठ. पर गोपाळ चांदोरकरांच्या मते ही पण कार्यालये व्हती आन त्यात  सुरवातीची सहा कार्यालये गुप्तहेरखात्याची व्हती. म्होरं गेल्याव डावीकडं टकमक  टोकाला रस्ता जातोय. ते पाहून  परत वरती यायचं, म्होरं गेल्याव जगदीश्वर मंदिर त्याला खेटूनच महाराजांची समाधी. तिथं लोटांगण घ्यायचं. शिवप्रभुंचं रूप आठवायचं. जगदीश्वर आणि समाधीच्या दाराला पाठीमागून हिरुजी इंदलकरांनी शिलालेख कोरलाय.....लेखाव सुरवातीला रायगडावर जे बांधकाम केलय त्याची माहिती दिल्याली हाय नंतर शेवटाल्या ओळीत लीव्हलंय. "जोपर्यंत आकाशांत चंद्र , तारे, ग्रह, नक्षत्र असत्याल तोपर्यंत रायगडाची कीर्ती आसंल." खाली पायरीव्ह लिव्हलंय "सेवेसी तत्पर हिरुजी इटळकर" जगदीश्वराच्या मंदिरामागं कोळीम तलाव. उजव्या बाजूला धनगर आवश्यातून खाली बारा टाकी, म्होरं धान्याची कोठारं. परत वरती आलं की म्होरं गेल्याव मावळ्यांच्या छावण्या चालू व्हत्यात. गोपाळ चांदोरकरांच्या मते, "सैनिकांना बराकी बांधून देणारा हा जगातला पहिला राजा." म्होरं गेल्याव काळा हौद लागतो त्यात बारमाही पाणी असतं. म्होरं गेल्याव दारू कोठाराचे अवशेष, नंतर भवानी कडा. त्यो उतरून गेल्याव मोठी कपार लागती तिथं पूर्वीचा पहारा व्हता. महाराज पूर्वी कडा यंघायच्या शर्यती घेत, पायथ्याला दवंडी दिल्ही जात. अमुक कडा चढून येणाऱ्यास मानाचं कडं आन सवराज्यात चाकरी. ह्याच्या मागचा मनसुबा मंजी जिथून गडी यंघल त्यो कडा कमजोर झाला समजायचा मग त्यो पुन्यांदा तासून बेलाग करायचा. तर अशी एक गोष्ट हाय  भवानी कड्याकडून एक धनगर पोऱ्या चढून वरती आला महाराजांनी त्याचं कौतुक करून त्याला सोन्याचं कडं देऊन चाकरीस ठेवला त्याचं नाव सर्जा धनगर. आन त्यो कडा तासून घेतला. परत माघारी फिरायचं मेना दरवाजाकडं यायचं तिथून हिरकणी बुरुजाकडं वाट खाली गेल्याली हाये तिकडं जायचं तिथ गेल्याव मावळती बघायची परत माघारी फिरायचं. राजवाड्याकडं यायचं तिथ एक पाटी लीव्ह्लीया 'महाराजांचे प्राण गेले ती जागा.' अनवाणी व्हायचं आन तिथली माती भाळाला लावायची. रायगड बारकाईने पघायला आठ दिस पुरत न्हाय आन समजून घ्यायला आख्खी हयात.  

Saturday 13 June 2020

राजमाची







 


लोणावळ्याहून  म्होरं खंडाळ्याच्या उजव्या अंगानी कुणं लागतंम्हमईच्या शिरीमंतांचं काचंचं बंगलं  मागं टाकलं की गरिबांची ठाकरवाडी लागती ती सोडली की रामुष्यावानी उच्च पुरा काळा कातळखडक चालू होतो ह्यो माचीचा बिनीचा पहारेकरी... तेच्या काळ्या कुळकुळीत अंगावून पांढराझरीत धबाबा खाली उडी घेतो त्यो टिपीत म्होरं सरकायचं... दगुड गोटं आन माती चिखुल हीच वाट सोबतीला...राजमाची तिथून डोळ्यादेखत हाताव येती पण ती ह्या वाटंची नजरबंदी. कार्तीकानी प्रीत्विला वळसा घालावा तसं म्होर गेल्यागत वाटत रहातं.  वाट संपत नाय आन माचीचा बुरुज नजरंला शिवत राहतो. 

अर्जुन, हिरडा, बेहडा, ऐन, पळस, सागवान, आंबा, जांभळी, करवंदं, आन मव्हांची झाडं पहिल्या पावसानी न्हाऊन धूऊन झाल्याव अंगाचा वास सोडण्यात नुसती इरशीर दाखिवित्यात. पर त्यो वास घ्यावा लागतोया, त्यो असा येत नसतोया. रानपानांच्या कुस्कऱ्याचा वास आन माची जवळ आल्याचा भास मन भुलवून टहाळ देवापाशी सोडतोया...हिथूनच रानाच्या पोटात शिरायचा परवाना मिळतोया....  टहाळदेवाला टहाळा वाहीचानिरीघ्न स्मरायचं....करवंदं चुपित  व्हट चिटकीत हाडकी जांभळं चघळीत जिभा जांभळ्याभोर आभाळाला दाखवीत पुढल्या वढ्यापर्यंत निघायचं... 

तिथं ऐनाच्या झाडाला खेटून अंता काकानी हेरल्याली किरी उभी हाय. ऐनाची लई दिसाची सोबतीण....तेची काळ्यांच्या तोंडात मारील अशी हिरवी पिवळी करवांदं पॉट भरस्त्वर चुपायची.... अंताकाकाच्या म्हणण्यानुसार ह्या रानात चारच किरी करवांदंची झाडं राहील्याती...तिथून म्होर लगोलग डाव्या अंगाच्या वीरगळीला हात जोडला की, अंताकाकाची आठवण येतीया, "अंताकाका, ही वीरगळ कुन्हाची म्हणायची ? जी ! माझ्या बापानं म्हंजी खंड्बानं सांगितलं की नेताजी पालकर हायती म्हून." शोध नंतर घेऊ असू दे कुन्हीबी. रगात जिमिनीव शिपडूनच ती राजाची हवाली केली आन माझ्या राजानी तीचं सवराज्य केलं. टीप्पूस आपसुखच येतया त्या वीरगळीकडं पघून. तिथून निघायचं येशिव थांबायचं, राजाच्या काळातली जागती येस आता म्हसनवाट होऊन पडलीया. तरीपण येशिवरला हनुमंता अंजून पहारा देतुया...."हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी" म्हणत हनुमंताला लोटांगण घालायचं, पुढं निघायचं.....

समुरच्या श्रीवर्धनच्या बुरुजाव भला थोरला ढगुळ भरून आलाय, तेला वळीवाची पहिली आंघुळ घालाया... त्यांअगुदार तेच आंग कोकणातल्या वाऱ्यानी चोळून काढलया. ह्या वर्साची तेची पहिली बाळंत आंघुळ. तेची आंघुळ बघत बघत  वढा वलिंडून तेलाच गाठला की, पहिलं मेटं श्रीवर्धनच्या खाली कातळधार धबाब्याच्या समुर तेच्या बुबुळात बुबुळ घालून मारायचं... इप्रीतच रानभूल म्हणायची...... आक्षी नजरबंदी.....वरून दुधाची चवरी वतावी आन वाऱ्यानी मधूनच आयती पळवून मातीला न देता ढगुळालाच पुन्यांदा द्यावी....  आधाश्यासारख संबुरचं चितार नजरनी पिऊन घ्याचं आन तिथून म्होरं उधेवाडीला 'माचीवरल्या बुधाच्याघरात मुक्काम ठोकायचा......रातच्याला मसुराची आमटी आन भात हाणायचा ....घरातल्या लोकांबरोबर गप्पागोष्टी नंतर अंधारल्याव  समुरच्या झाडाव काजव्यांची साळा भरती जणू काय चांदण्याचा महूरच झाडाला लगाडलाय. डोळं झाकीपर्यंत पघायच. रात जशी चढत जाती तशी मव्हावानी झोपेची गुंगी चढतीया. सकाळी आपसुख जाग आली त ठीक नायत पाखरं जागलीला हायतीच...

'माचीवरला बुधा' आप्पांनी लीव्ह्लीया बुधा म्हंजी खंडबा आजोबा, म्या काय पाहिला नाय पर तेच्या मोठ्या मुलात म्हंजी अंता काकात मला बुधा दिसतोया....हेच्यासारखा वाटाड्या आत्ता तरी त्या रानात उरला नाय...तेला घ्याचं. पाय तुटीस्तवर रान हिंडायचं. मनरंजन....श्रीवर्धन.....गोधनेश्वर....राई...तळं...थडीचा आंबा... कोकणदरवाजा.......

मनरंजनाव यंघून इरशाळगड आन प्रबळगड नजंरंत लख्ख भरतोया, त्यापलिकडं कलावंतीनीचा सुळका. त्यो लेणी उतरताना कधी लपंतो कधी दिसतो.... मनरंजनाहून उतारानी श्रीवर्धनकडं निघायचं ......गच्च झाडोरा वालिंडला की भैरुबाच्या देवळाच्या मागं निघ्तुया... तेला दंडवत घालून तेच्या अबलख घोड्याला दंडवत घालून श्रीवर्धन यंघायचा.... टाक्या, तटबंदी, दरवाजा बरुबर गप्पा मारून म्होरं सरकल्याव ऐस-पैस दोन दगडी खोल्या लागत्याती....त्यात ओंकाराचा ध्वनी लाऊन समाधी लावायची....खोपडीच्या टवक्यातून मेंदूत शांती शिरतीया....घोराचं इस्मरण होतंया......श्रीवर्धनच्या सदरेव जाऊन समुर पाहिलं की सात जल्माचा सर्ग सात पळांत गाठता येतोया.... श्रीवर्धन उतारला की वाडीत याचं.....पिठलं- भाकर, भात आमटी , लसणाची चटणी चापली की, दुपारच्या झोपेला राईच्या उजव्या अंगानी म्होराकडला जाऊन थडीचा आंबा गाठायचा.... मावळती खंडाळ्याहून कलडाया लागली की गोधनेश्वरकडं निन्घायचं...तिथं साक्षात कैलासीचा संभू तीन हजार वरीसापासून ठाण मांडून बसलाय....तेला तळ्यातल्या पाण्यानी अभिषेक घालायचा नंतर मावळती हून अंधारालं की राईपार करून वाडी गाठायची......

म्होरच्या दिसाला मंग नंतर आळू खात खात पलाडल्या अंगानी खंडाळा बोगदा बघत बघत कर्जतला उतरायचं कोंढाणा लेणीसाठी.......किर्र रानात सर्ग चितारलाय काळ्या-पिवळ्या पाषाणातून.... ते कोरणाऱ्या हातांना मनातच हात जोडायचं...दगुड ना दगुड बोल्तोया तिथला. मंग तेंच्या बरुबर गप्पा हाणायच्या.....तिथं समाधी घ्याची मंग परत माचीव याचं....चार दिस उलटून गेलंलं असत्यात....साध्या- भोळ्या अंताकाकाचा चार दिसांचा संग म्हंजी चार दिस भैरुबाच पाठराखनीला.... पायाला रहाटी आन नशिबाला परपंच हाय म्हून शहराकडं घरला पाय जडशीळ व्हत्यात....न्हायतं ह्या रानात माझ्या शिवबा राजानी नेमून दिलेली जागल एक जलम काय सात जलीम करील.........................

 

 

 

रायगड

रायगड आडवाटंला म्हणावं त हमरस्ता पडतोया आन हमरस्ता म्हणावं त आडवाटंला हाय, घाटाच्या खाली म्हणावं त घाटवाटा आडवल्यात आन घाटाव म्हणाव त कोकना...