लोणावळ्याहून म्होरं खंडाळ्याच्या उजव्या अंगानी कुणं लागतं, म्हमईच्या शिरीमंतांचं काचंचं बंगलं मागं टाकलं की गरिबांची ठाकरवाडी लागती ती सोडली की रामुष्यावानी
उच्च पुरा काळा कातळखडक चालू होतो, ह्यो माचीचा बिनीचा पहारेकरी... तेच्या काळ्या कुळकुळीत अंगावून पांढराझरीत
धबाबा खाली उडी घेतो त्यो टिपीत म्होरं सरकायचं... दगुड गोटं आन माती चिखुल हीच
वाट सोबतीला...राजमाची तिथून डोळ्यादेखत हाताव येती पण ती ह्या वाटंची नजरबंदी.
कार्तीकानी प्रीत्विला वळसा घालावा तसं म्होर गेल्यागत वाटत रहातं. वाट संपत नाय आन माचीचा बुरुज नजरंला शिवत
राहतो.
अर्जुन, हिरडा,
बेहडा, ऐन, पळस, सागवान, आंबा, जांभळी, करवंदं, आन मव्हांची झाडं पहिल्या पावसानी न्हाऊन
धूऊन झाल्याव अंगाचा वास सोडण्यात नुसती इरशीर दाखिवित्यात. पर त्यो वास घ्यावा
लागतोया, त्यो असा येत नसतोया. रानपानांच्या कुस्कऱ्याचा वास
आन माची जवळ आल्याचा भास मन भुलवून टहाळ देवापाशी सोडतोया...हिथूनच रानाच्या पोटात
शिरायचा परवाना मिळतोया.... टहाळदेवाला टहाळा वाहीचा, निरीघ्न
स्मरायचं....करवंदं चुपित व्हट चिटकीत हाडकी जांभळं चघळीत जिभा
जांभळ्याभोर आभाळाला दाखवीत पुढल्या वढ्यापर्यंत निघायचं...
तिथं ऐनाच्या झाडाला खेटून अंता काकानी हेरल्याली किरी उभी हाय.
ऐनाची लई दिसाची सोबतीण....तेची काळ्यांच्या तोंडात मारील अशी हिरवी – पिवळी करवांदं पॉट भरस्त्वर
चुपायची.... अंताकाकाच्या म्हणण्यानुसार ह्या रानात चारच किरी करवांदंची झाडं
राहील्याती...तिथून म्होर लगोलग डाव्या अंगाच्या वीरगळीला हात जोडला की, अंताकाकाची आठवण येतीया, "अंताकाका, ही वीरगळ कुन्हाची म्हणायची ? जी ! माझ्या बापानं
म्हंजी खंड्बानं सांगितलं की नेताजी पालकर हायती म्हून." शोध नंतर घेऊ असू दे
कुन्हीबी. रगात जिमिनीव शिपडूनच ती राजाची हवाली केली आन माझ्या राजानी तीचं
सवराज्य केलं. टीप्पूस आपसुखच येतया त्या वीरगळीकडं पघून. तिथून निघायचं येशिव
थांबायचं, राजाच्या काळातली जागती येस
आता म्हसनवाट होऊन पडलीया. तरीपण येशिवरला हनुमंता अंजून पहारा
देतुया...."हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी" म्हणत हनुमंताला लोटांगण घालायचं, पुढं निघायचं.....
समुरच्या श्रीवर्धनच्या बुरुजाव भला थोरला ढगुळ भरून आलाय, तेला वळीवाची पहिली आंघुळ
घालाया... त्यांअगुदार तेच आंग कोकणातल्या वाऱ्यानी चोळून काढलया. ह्या वर्साची
तेची पहिली बाळंत आंघुळ. तेची आंघुळ बघत बघत वढा वलिंडून तेलाच गाठला की, पहिलं मेटं श्रीवर्धनच्या खाली कातळधार
धबाब्याच्या समुर तेच्या बुबुळात बुबुळ घालून मारायचं... इप्रीतच रानभूल
म्हणायची...... आक्षी नजरबंदी.....वरून दुधाची चवरी वतावी आन वाऱ्यानी मधूनच आयती
पळवून मातीला न देता ढगुळालाच पुन्यांदा द्यावी.... आधाश्यासारख
संबुरचं चितार नजरनी पिऊन घ्याचं आन तिथून म्होरं उधेवाडीला 'माचीवरल्या बुधाच्या' घरात
मुक्काम ठोकायचा......रातच्याला मसुराची आमटी आन भात हाणायचा ....घरातल्या लोकांबरोबर गप्पागोष्टी नंतर
अंधारल्याव समुरच्या झाडाव काजव्यांची साळा भरती जणू काय चांदण्याचा महूरच
झाडाला लगाडलाय. डोळं झाकीपर्यंत पघायच. रात जशी चढत जाती तशी मव्हावानी झोपेची
गुंगी चढतीया. सकाळी आपसुख जाग आली त ठीक नायत पाखरं जागलीला हायतीच...
'माचीवरला बुधा' आप्पांनी
लीव्ह्लीया बुधा म्हंजी खंडबा आजोबा, म्या काय पाहिला नाय पर
तेच्या मोठ्या मुलात म्हंजी अंता काकात मला बुधा दिसतोया....हेच्यासारखा वाटाड्या
आत्ता तरी त्या रानात उरला नाय...तेला घ्याचं. पाय तुटीस्तवर रान हिंडायचं.
मनरंजन....श्रीवर्धन.....गोधनेश्वर....राई...तळं...थडीचा आंबा...
कोकणदरवाजा.......
मनरंजनाव यंघून इरशाळगड आन प्रबळगड नजंरंत लख्ख भरतोया, त्यापलिकडं कलावंतीनीचा सुळका.
त्यो लेणी उतरताना कधी लपंतो कधी दिसतो.... मनरंजनाहून उतारानी श्रीवर्धनकडं
निघायचं ......गच्च झाडोरा वालिंडला की भैरुबाच्या देवळाच्या मागं निघ्तुया...
तेला दंडवत घालून तेच्या अबलख घोड्याला दंडवत घालून श्रीवर्धन यंघायचा.... टाक्या,
तटबंदी, दरवाजा बरुबर गप्पा मारून म्होरं
सरकल्याव ऐस-पैस दोन दगडी खोल्या लागत्याती....त्यात ओंकाराचा ध्वनी लाऊन समाधी
लावायची....खोपडीच्या टवक्यातून मेंदूत शांती शिरतीया....घोराचं इस्मरण
होतंया......श्रीवर्धनच्या सदरेव जाऊन समुर पाहिलं की सात जल्माचा सर्ग सात पळांत
गाठता येतोया.... श्रीवर्धन उतारला की वाडीत याचं.....पिठलं- भाकर, भात – आमटी , लसणाची चटणी
चापली की, दुपारच्या झोपेला राईच्या उजव्या अंगानी
म्होराकडला जाऊन थडीचा आंबा गाठायचा.... मावळती खंडाळ्याहून कलडाया लागली की
गोधनेश्वरकडं निन्घायचं...तिथं साक्षात कैलासीचा संभू तीन हजार वरीसापासून ठाण
मांडून बसलाय....तेला तळ्यातल्या पाण्यानी अभिषेक घालायचा नंतर मावळती हून
अंधारालं की राईपार करून वाडी गाठायची......
म्होरच्या दिसाला मंग नंतर आळू खात खात पलाडल्या अंगानी खंडाळा बोगदा बघत बघत कर्जतला उतरायचं कोंढाणा लेणीसाठी.......किर्र रानात सर्ग चितारलाय काळ्या-पिवळ्या पाषाणातून.... ते कोरणाऱ्या हातांना मनातच हात जोडायचं...दगुड ना दगुड बोल्तोया तिथला. मंग तेंच्या बरुबर गप्पा हाणायच्या.....तिथं समाधी घ्याची मंग परत माचीव याचं....चार दिस उलटून गेलंलं असत्यात....साध्या- भोळ्या अंताकाकाचा चार दिसांचा संग म्हंजी चार दिस भैरुबाच पाठराखनीला.... पायाला रहाटी आन नशिबाला परपंच हाय म्हून शहराकडं घरला पाय जडशीळ व्हत्यात....न्हायतं ह्या रानात माझ्या शिवबा राजानी नेमून दिलेली जागल एक जलम काय सात जलीम करील.........................








सुंदर 🙌🏻
ReplyDelete